लग्नाला यायचं हं!!! बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने सांगितली वेडिंग डेट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. यातील बरीच जोडपी लव्ह मॅरिज करत आहेत. अनेक वर्ष, महिने.. दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर, एकमेकांना समजून एकमेकांमध्ये विलीन होण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. काही दिवसांपुर्वीच बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी गुपचूप साखरपुडा उरकून लग्नाची तारीख जाहीर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता अभिनेत्री मीरा जोशीनेही सोशल मीडियावर बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लग्नाची तारीख सांगितली आहे.

अभिनेत्री मीरा जोशीने अलीकडेच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अतिशय सुंदर असे फोटोशूट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. पण या फोटोंमध्ये तिने तिचा होणार लाईफ पार्टनर कोण आहे..? हे मात्र गुलदस्त्यात ठेवले होते. अखेर आता लगीनघाई सुरु झाली असता मीराने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या ५ सप्टेंबर २०२३ रोजी मीरा तिचा बॉयफ्रेंड नेहूल सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच मीराच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अगदी चार दिवसांवर लग्न येऊन ठेपल्यामुळे मीराच्या घरी लग्नाआधीच्या विधी आणि सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्री मीरा जोशीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव नेहुल वारुळे आहे. नेहुल हा एक अभिनेता आणि डान्सर आहे. नेहुलने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या शोचे विजेतेपद पटकावले आहे. माहितीनुसार, नेहुल आणि मीरा गेल्या अनेक दिवसांपासुन रिलेशनशीपमध्ये आहेत. पण नेमके केव्हापासून ते एकमेकांना डेट करत आहेत हे नक्की सांगता येणार नाहीत. सध्या लग्न तोंडावर असल्यामुळे जोशी आणि वारुळे कुटुंबात जोरदार लगीनघाई सुरु आहे.