हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ ही मालिका एकेकाळी फार लोकप्रिय ठरली होती. मालिका संपली असली तरी मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेत एक गोड भुत होतं. ज्याची भूमिका साकारून अभिनेत्री सरिता मेहेंदळे हि प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सरिताने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सरिताने पोस्ट शेअर करत ती आई झाल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री सरिता मेहेंदळे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. नुकतीच तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या पहिल्या बाळाच्या जन्माबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री सरिता मेहेंदळेने दोन महिन्यांपूर्वी आपल्या गरोदरपणाची गुडन्यूज शेअर केली होती. यानंतर आता सरिताने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नववर्षाच्या दिवशी सरिताच्या घरी पाळणा हलला असून तिला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे.
सरिताने १ जानेवारी २०२४ रोजी तिच्या पहिल्या अपत्यास जन्म दिला आहे. सोशल मीडियावर तिने ‘इट्स अ बॉय’ असे लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिने बाळाच्या जन्माची तारीख लिहिली आहे. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर सरिता आणि तिचे पती सौरभ जोशी प्रचंड आनंदात आहेत. आता दोघे सरिता आणि सौरभ मिळून पालकत्वाच्या नव्या प्रवासाला मार्गस्थ झाले आहेत. लग्नानंतर ५ वर्षांनी हे सुख त्यांना लाभल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. सरिताच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.