हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री श्वेता मेहंदळे पुन्हा एकदा मालिका विश्वात झळकते आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत काम केल्यानंतर श्वेता आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र सध्या श्वेता या भूमिकेमुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
मराठी अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. त्यामुळे फोटो, व्हिडीओ आणि विविध पोस्ट शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. श्वेताला बाईक राईडची भारी हौस आहे. शिवाय तिला फिरण्याचीही खूप आवड आहे. त्यामुळे अनेकदा फिरतीवरचे व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. नुकतंच श्वेताने तिच्या कोकण दौऱ्याचे दोन ब्लॉग युट्यूबवर पोस्ट केले आहेत. या ब्लॉगला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळाली. पण काही नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करताना धर्माचा वापर केला आहे. यातील एकाला तिने सडेतोड उत्तर दिल्याचा स्क्रिनशॉट तिने शेअर केला आहे.
श्वेताने शेअर केलेल्या या स्किनशॉटमध्ये एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करताना लिहिलंय, ‘इंग्रज भारतातून जाताना ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी आपली औलाद म्हणून सोडून गेली’. यावर अभिनेत्री श्वेता मेहंदळेने अत्यंत थेट आणि परखडपणे रिप्लाय करत म्हटले आहे, ‘तुमचे हे विचार आहेत…? आणि ही भाषा आहे..?’ श्वेताने हा स्क्रिनशॉट अधीकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याबरोबरच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्या युट्यूब चॅनलवर मी केलेल्या ट्रॅव्हल व्लॉगवर आलेली ही प्रतिक्रिया’. श्वेताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.