‘हृदयाचा काही भाग निर्जीव.. 15 ते 20 लाख खर्च..’; बहिणीच्या उपचारासाठी अभिनेत्री मागतेय आर्थिक मदत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री स्नेहा धडवई ही ‘बोक्या सातबंडे’ या व्यावसायिक नाटकात झळकली होती. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिची फॅनफॉलिंग बरीच वाढली आहे. दरम्यान ती सोशल मीडिया पोस्ट नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शिवाय तिने ‘घोडा’ या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहिले आहे.

नुकतंच तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून मदतीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट तिने तिच्या मामेबहिणीच्या उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी शेअर केली आहे.

स्नेहा धडवईने हि पोस्ट शेअर करताना लिहिले कि, ‘१३ वर्षांची श्रावणी येवले. ती केवळ 3 वर्षांची होती तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने तिचे वडील गेले. अन मागच्या बऱ्याच काळापासून स्वतः श्रावणी देखील हृदयविकाराच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. सध्या तिला पुण्याच्या डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ऍडमिट केलेलं असून तिच्यावर Heart transplant म्हणजे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च सांगितलेला आहे. श्रावणीच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची असून तिची आई एकटीने चार जणांचं कुटुंब सांभाळतेय. त्यांच्यासाठी इतकी मोठी रक्कम उभं करणं शक्य नाहीये. त्यामुळं श्रावणीला आपल्या सर्वांच्या आर्थिक मदतीची प्रचंड गरज आहे’.

‘याआधी श्रावणीवर Heart Valve Replacement ची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण त्यानंतर ही तिला हार्ट फेलियरचा त्रास सहन करावा लागतोय. सध्या तिच्या हृदयाचा काही भाग निर्जीव झालाय. शरीरात पाणी वाढतय आणि त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया होणं गरजेचंय. श्रावणीसाठी आता मी तिची मामेबहीण स्नेहा धडवई Crowd Funding मधून आर्थिक मदत जमवण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय. श्रावणीला आता तुमच्याही आर्थिक मदतीची गरजय. अगदी 1 रुपयापासून 10000 रुपयांपर्यंत तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत खाली दिलेल्या UPI नंबर्सवर किंवा बँक अकाऊंटवर पाठवू शकता. जेवढ्या लवकर आपण पैसे गोळा करू तेवढ्या लवकर श्रावणीचं ऑपरेशन सुरू होईल. माणूस म्हणून पुढाकार घेऊयात”