‘दुपारी 2 ते 4 मी बंद असते…’; अभिनेत्री स्पृहा जोशीचे पुणेरी वक्तव्य चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने नाटक, मालिका, सिरीज, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावर स्पृहा कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवाय तिचे स्वत:चे युट्यूब चॅनेल असल्यामुळे तिचा चाहता वर्गही फार मोठा आहे. अलीकडेच स्पृहाने एका वृत्त माध्यमाला खास मुलाखत दिली. ज्यामध्ये तिने स्वतःबद्दल काही खास गोष्टी आवर्जून सांगितल्या आहेत.

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री स्पृहा जोशी म्हणाली की, ‘घरात काहीच काम न करता मी एकटी बसू शकत नाही. माझ्या डोक्याला सतत काहीतरी खाद्य लागतं. दिवसभरात मी स्वत:साठी वेगवेगळी कामं शोधत असते. घरी काहीच कामं नसतील तर मी झोपून राहते. मी मानसिक पुणेकर आहे. काहीच काम नसेल तर मी झोपून जाते. दररोज दुपारी २ ते ४ मी बंद असते… नो एण्ट्री आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवाच्या दयेने मला दुपारच्या वेळी कोणत्याही जागेत झोप येते. गाडीत वगैरे कुठेही मी छान झोपू शकते. माझे मित्र- मैत्रिणी माझ्याबरोबर असतील तरीही मला कुठेही झोप लागते’.

याशिवाय मुलाखतीत तिने स्वत:च्या वैयक्तिक युट्यूब चॅनेलबद्दल सांगताना म्हटले, ‘लॉकडाऊनमध्ये पहिले सहा महिने लोकांकडे काहीच काम नव्हते. हळूहळू मला कंटाळा येऊ लागला. त्यात मला कवितांची प्रचंड आवड असल्याने मी युट्यूब चॅनेल सुरु करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी माझे सबस्क्रायबर्स सुद्धा वाढले. खजिना सीरिज, पुस्तकांचे रिव्ह्यूज, जगाच्या पाठीवर या सीरिजमुळे संपूर्ण युट्यूबची प्रोसेस मला कळाली आणि आता माझे १ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत’.