अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचे निधन; राहत्या घरीच घेतला अखेरचा श्वास


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिची आई आजारी होती आणि याच आजारपणात त्यांचे निधन झाल्याचे समजत आहे. संपूर्ण प्रधान कुटुंब शोकाकुल अवस्थेत आहे.

माहितीनुसार, तेजश्री प्रधान तिने केलेल्या मालिकांच्या सेटवर अनेकदा आईसोबत जात असे. तिची आई लांबून लेकीला काम करताना पाहून आनंद व्यक्त करायची, कौतुक करायची असे अनेक मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले आहे. आपली मुलगी मालिकांमध्ये काम करते, हे तिच्या आईला फार आवडत असे. त्यामुळे तेजश्रीसोबत वेगवेगळ्या मालिकांच्या, सिनेमाच्या शूटिंग सेटवर त्या आवर्जून येत असत. तेजश्रीच्या अलीकडेच सुरु झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचे जेव्हा स्पेशल स्क्रीनिंग झाले तेव्हाही अभिनेत्रीचे आई- बाबा उपस्थित राहिले होते.

या मालिकेच्या स्क्रिनिंगवेळी तेजश्रीची आई म्हणाली होती कि, ‘आतापर्यंत तेजश्रीने विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तिची ‘अगंबाई सासूबाई’मधली भूमिका मला फार आवडली होती. माझं असं नेहमी म्हणणं असतं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, सहन करत राहू नये. ती तिची भूमिका तशी होती. तर या मालिकेतही पुढे तशीच होताना दिसेल. आम्ही तिचं काम पाहिलं आहे आणि आवडलं आहे’. तेजश्रीची आई तिला नेहमी वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रेरणा देत असे. त्यामुळे आईच्या निधनाने तेजश्री पूर्णपणे कोलमडली आहे.