हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने निरोप घेतला. यानंतर मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुलने हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्याचे जाहीर केले. यानंतर आता मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी शेअर केली आहे. या मालिकेत आयेशा हे निगेटिव्ह पात्र साकारून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजेच विदिशा म्हसकर. ती सध्या ‘झी मराठी’च्या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. गणेशोत्सवानिमित्ताने ‘झी मराठी’ने सुरू केलेल्या कार्यक्रमात ती दिसतेय. यानिमित्ताने तिला लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले आणि याचा आनंद तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विदिशाने ही पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे कि, ‘मागच्यावर्षी मी पहिल्यांदा लालबागच्या राजाला बघितलं, त्याच दर्शन घेतलं. खूप काही मागायच ठरवलेलं… पण प्रत्यक्षात जेव्हा त्याच्या चरणापाशी पोहोचले तेव्हा मात्र सगळं विसरुन त्याच्याकडे बघतचं राहिले. जो मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतो, मी व्यक्त केलेल्या गोष्टी सत्यात उतरवण्याची ताकद ज्याच्याकडे आहे. मला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो आपोआप धडा शिकवतो त्याच्याकडे मी काय मागणार? त्यामुळेच मी म्हणते की, तो माझा वैयक्तिक बाप्पा आहे’.
‘अशाच वेळी माझ्या डोक्यात विचार आला की पुढच्या वर्षीही असंच दर्शन होईल का? आणि तुमचा विश्वास बसणार नाही पण यावर्षी बाप्पाने स्वतःच मला त्याच्या दरबारात यायचं आमंत्रण दिलं… त्याची माहिती, विविध मंडळांची महिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची, भाविकांशी गप्पा मारण्याची संधी मला मिळाली. आणि मी थेट जाऊन पोहोचले राजाच्या दरबारात… मी विदिशा म्हसकर, तुमचा सगळ्यांचं स्वागत करते. झी मराठी प्रस्तुत ”बोल बाप्पा” कार्यक्रमात… तर भेटू… रोज संध्याकाळी ५.०० वाजता फक्त ”झी मराठी”वर…’. विदिशाच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.