‘ठरलं तर मग’ मालिकेतील महिला कलाकारांची मान्सून ट्रिप; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे आवडते आहे. मुख्य म्हणजे मालिकेतील अर्जुन आणि सालीची जोडी तर सगळ्यात खास. काही दिवसांपूर्वी सायलीचा म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीचा वाढदिवस झाला. पण शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमुळे तिने वाढदिवस साजरा केला नाही. मग जुईला वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे म्हणून ‘ठरलं तर मग’ मालिकेतील महिला कलाकारांनी खास ट्रिपचे नियोजन केले होते. त्यांच्या मान्सून ट्रिपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सर्व अभिनेत्री मिळून मान्सून ट्रीपसाठी गेल्या होत्या. वाढदिवस जुईचा होता म्हणून तिच्या फेव्हरेट कर्जतमध्ये या ट्रिपचे नियोजन करण्यात आले. त्यांच्या कर्जत ट्रिपचा व्हिडीओ जुईने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘काही सरप्राईज खूपच सुंदर असतात. माझा वाढदिवस माझ्या मालिकेतील मैत्रिणींनी साजरा केला. आम्ही कर्जतला फिरायला गेलो होतो. तिथे जाऊन आम्ही भाज्यांची शॉपिंग केली. व्हिडीओ बनवले आणि बरंच काही केलं…लव्ह यू माय गर्ल्स’.

जुईने हा व्हिडिओ जागतिक मैत्री दिवसाच्या निमित्ताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेत जुईच्या सासूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता दिगे गाडी चालवताना दिसत आहेत. शिवाय मालिकेत तन्वी ही खलनायकी भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर आणि अभिनेत्री दिशा दानाडे देखील या व्हिडिओत दिसत आहेत.