हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा ही कारणांमुळे चर्चेत असते. अदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे ती कायम स्वतःचे सुंदर फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. अदा खरंतर अमराठी आहे. मात्र तरीही तिला मराठी भाषेची प्रचंड आवड आहे. त्यामुळे अदा कायम वेगवेगळ्या मराठी कविता सादर करताना दिसते. आताही तिने एक मराठी कविता तिच्या अंदाजात बोलून दाखवली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अभिनेत्री अदा शर्माला मराठी संस्कृतीबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम आहे. तिला मराठी लोक फार आवडतात आणि त्यामुळे मराठी कविता सादर करण्याची तिची एक वेगळीच आवड आहे. अनेकदा अदा सोशल मीडियावर मराठी कविता सादर करत असते. आताही तिने एक नवी मराठी कविता सादर केली आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. सर्वात आधी ‘चिडलेली इडली’, ‘अटक मटक चवळी चटक’, ‘जाड्या आणि रड्या’, ‘स्वप्नात पाहिली राणीची बाग’ या कवितांनंतर अदाने सादर केलेली ‘कोंबडीला आला टेलिफोन’ ही कविता नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
अदाने सादर केलेली कविता काहीशी अशी आहे..
ट्रिंग ट्रिंग… कोंबडीला आला टेलिफोन.. तिने विचारले बोलतंय कोण..?
बोलत होता रावस मासा.. तो म्हणाला, सावध असा…
शार्कची आहे मेजवानी.. हिंडू बिंडू नका कोणी..
कोंबडीने फोन ठेवून दिला. तिचा जीव घाबरून गेला..
तेव्हढ्यात आली बकरी बाई..तिला काय ठाऊकच नाही.., अशी काहीशी हि कविता आहे. अत्यंत कॉमिक अंदाजात अदाने ही कविता सादर केली आहे. जिला तासाभरात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत अदाच्या सादरीकरणाचे कौतुक केले आहे.