‘माझ्या मम्मीचं स्वप्नं होतं…’; स्वतःचा पेट्रोल पंप सुरु केल्यानंतर आदर्श शिंदे पहिल्यांदाच झाला व्यक्त


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वात शिंदेशाही घराण्याचे नाव फार मोठे आहे. या घराण्याची चौथी पिढीदेखील त्यांचा संगीताचा वारसा चालवते आहे. आदर्श शिंदे हा याच पिढीतील तरुण गायक. ज्याने आघाडीच्या गायकांमध्ये स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे घराणं प्रचंड चर्चेत आहे. कारण अलीकडेच शिंदेंनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करत पंढरपूर येथील वेळापूरमध्ये स्वतःचा पेट्रोलपंप सुरु केला. या पेट्रोलपंपाला आदर्श आनंद शिंदे असे नाव देण्यात आले आहे. हि माहिती उत्कर्ष शिंदेने दिल्यानंतर आता आदर्शने एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गायक आदर्श शिंदेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिंदेंचा नवा पेट्रोलपंप दिसतो आहे. या व्हिडीओत आदर्शने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘भिमाची पुण्याई… “Adarsh Anand Shinde Petroleum”. माझ्या “मम्मीचं” स्वप्नं होतं, ते पूर्ण केलं. आपला पेट्रोल पंप असायला पाहिजे असं तिला खूप वर्ष वाटत होतं आज ते सत्यात घडलं याचा आनंद आहे. एका नवीन विश्वात entry केली आहे, बघुया पुढचा प्रवास कसा होईल!’

पुढे लिहिलंय, ‘माझा मोठा भाऊ हर्षद शिंदे याने आधार दिला नसता तर हे शक्य झालं नसतं. कारण या उद्योगाला लागणारा वेळ, मनुष्य बळ आणि विश्वास माझ्या भावाकडे नसता तर हे शक्य झालं नसतं. आमच्या गावी ”मंगळवेढे” इथे अनेक उद्योग करत असताना भाऊ म्हणाला “तू कर मी आहे”. या एका त्याच्या वाक्यामुळे जे बळ मिळालं ते शब्दात मांडता येणार नाही. तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं करु शकलो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!!’ आदर्शने शेअर केलेली हि पोस्ट व्हायरल होत असून नेटकरी प्रतिक्रिया देत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.