‘हदयी तुमच्याही राम हवा…’; अयोध्येतील मंदिर उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदेचं नवं गाणं रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य स्वरूपात उद्‌घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. अशातच श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधून प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. प्रसिद्ध मराठमोळा गायक आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला असून सोशल मीडियावर प्रभू श्रीराम हे गाणे व्हायरल होत आहे.

प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे. तर या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे. विपुल शिवलकर लिखित या अद्भुत गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता…’ असे काहीसे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यासाठी तयार करण्यात आलेलं संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारे आणि चैतन्य निर्माण करणारे आहे.

या गाण्यासाठी ग्राफिक्सचा उत्तम वापर करण्यात आला आहे. उत्तम संगीत, श्रवणीय गायन आणि सर्वोत्तम ग्राफिक्सचा माध्यमातून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती तसेच श्रीराम मंदिराची काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना ‘प्रभू श्रीराम’ या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला आणखीच उधाण येत आहे.