हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय आणि मालिकेतील रंजक ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेत नुकतेच नायिका अक्षरा आणि नायक अधिपती यांचे लग्न पार पडले. यानंतर आता ही जोडी जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी गेल्याचे मालिकेत दाखवले आहे. दरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत असून अधिपतीची भूमिका ऋषिकेश शेलार साकारतो आहे. अधिपती आणि अक्षर लग्नानंतर देवदर्शनासाठी गेले आहेत. या विशेष भागच प्रोमो आणि शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामध्ये अधिपती अक्षराला उचलून जेजुरीचा गड चढताना दिसतोय. सोबतच जेजुरीच्या खंडोबा देवळाच्या परिसरातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये अधिपती आणि अक्षरा दोघांचाही लूक फारच लक्षवेधी आहे.
या शूटिंग दरम्यानचा एक फोटो शिवानीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. तिच्या कपाळावर भंडारा, निळ्याशार रंगाची नऊवारी आणि साजेसे अलंकार, केसात गजरा असा तिचा लूक आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘येळकोट येळकोट जय मल्हार!’ नुकताच हा विशेष भाग प्रसारित झाला आहे. या भागात अक्षरा आणि अधिपती यांनी जेजुरीच्या खंडेरायाची मनोभावे पूजा करून त्याचा आशीर्वाद घेत आपल्या सुखी संसाराची सुरुवात केली आहे.