‘सुभेदार’ फेम अभिनेत्रीने नव्या घरानंतर खरेदी केली आलिशान गाडी; व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये जान्हवी हे पात्र साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आगामी प्रोजेक्ट्ससोबत, वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी देखील ती आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी नवं घरं खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर तिने आता आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री स्मिता शेवाळेने नुकतीच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन आलिशान गाडी विकत घेतली आहे. ही गाडी विकत घेऊन तिने तिचा लेक कबीर याला गोड सरप्राईज दिलं आहे. या नवीन गाडी खरेदीचा व्हिडीओ स्मिताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये स्मिता आपल्या लेखासोबत नव्या गाडीची पूजा करताना दिसते आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘ही कार घेताना मला खूप चांगली सर्विस देण्यात आली. आम्ही कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त असतो हे जाणून येथील कर्मचाऱ्यांनी कार प्रोसेसची सगळी कामं अगदी व्यवस्थित पार पाडली. कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ दिला नाही. अतिशय आदरपूर्वक आणि संयमानं माझ्या सगळ्या शंकांचं निरसन केलं त्यासाठी त्यांचे मनापासून आभार’.

दरम्यान स्मिता शेवाळेने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकरी, चाहते आणि सिने विश्वातील कलाकार मंडळी कमेंट करताना दिसत आहेत. प्रत्येकाने समितीचे नव्या गाडीसाठी अभिनंदन केले आहे आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री स्मिता शेवाळेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती स्टार प्रवाहावरील ‘मुरांबा’ या मालिकेत जान्हवी हे पात्र साकारताना दिसत आहे. शिवाय दिगपाल लांजेकर यांच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. तसेच ‘दार उघड बये’ या मालिकेने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये देखील स्मिता शेवाळे महत्वाच्या भूमिकेत काम करत होती.