हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवर सध्या सुरु असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या विशेष पर्वातून अलीकडेच अभिनेता समीर परांजपे बाहेर पडला. या कार्यक्रमात त्याने गायलेली गाणी रसिकांच्या मनाला भिडली. पण प्रवास कुठेतरी थांबायचाचं… तसा समीरचा हा प्रवास थांबला आणि या सुरेल तसेच सुंदर प्रवासात त्याचे सारथी ठरलेल्या प्रत्येकाचे आभार मनात त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने सलग २ पोस्ट शेअर केल्या ज्यातील एकात त्याने परीक्षक म्हणून लाभलेल्या गायक अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांचे आभार मानले आहेत.
समीरने या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘सूर नवाचे आमचे लाडके परीक्षक अवधूत गुप्ते काय बोलू मी दादा.. नारायणा नंतरची मिठी कायम लक्षात राहील.. तुमची शिट्टी आणि पार बुक्का पाडलास मित्रा हे ऐकलं की काय आनंद होतो सांगू.. महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून आमचं मन तूम्ही जिंकल आहेच.. परीक्षक म्हणून ही तुम्ही आम्हा सगळ्यांचे लाडके आहात.
पण इथे शूटींग सुरू होण्याआधी ज्या आत्मीयतेने तूम्ही सगळ्या स्पर्धकांची चौकशी करायचात, तब्येत वैगरे ठीक आहे ना विचारायचात, बाहेरगावाहून आलेल्या आणि स्पर्धेसाठी इकडे मुंबईत राहत असलेल्या स्पर्धकांना राहता तिथे काही अडचण नाही ना, सगळं नीट वेळच्या वेळी मिळतंय ना काहीही अडचण असेल तरी डायरेक्ट मला सांगा म्हणायचात.. तेंव्हा मला कळलं कुठल्याही गाण्यातला भाव तुम्ही इतक्या ताकदीने पेश कसं करू शकता.. तुमचं “माणूसपण” तुमच्या प्रत्येक गाण्यात उतरतं बहुदा!! परीक्षक म्हणून तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स मधून तर शिकलोच पण माणूस म्हणून ही खूप काही शिकवलंत.. खूप प्रेम.. आणि माझा वनवास संपवलात यासाठी कायम ऋणात राहीन’.
महेश काळे दादा गाण्यानंतरच्या तुमच्या सूचना कमेंट्स ह्या लाख मोलाच्या असतातच. त्याचे आम्ही स्पर्धकच नाही तर प्रेक्षक ही फॅन आहेत. पण कला ही साधना आहे आणि साधनेची शुचिर्भूतता कशी राखावी कलेशी एकनिष्ठ कसं राहावं, मेहनतीतून काय साधायचं आणि काय भेदायचं शिकवलंत.. तुम्ही गाता तेंव्हा अभिनेता गातोय असं वाटत नाही गाण्यावर जरूर मेहनत घ्या रियाजाची शिदोरी वाढवा मी तुम्हाला मदत करेन हे तुम्ही म्हणालात हे मला कायम आठवण करून देत राहील की मला गाणं करायचं आहे मेहनत घ्यायची आहे. तुमचे ही खूप आभार!!!
आणि सगळ्यात शेवटी रसिक प्रेक्षक, खरंतर मनात खूप भीती होती प्रेक्षक गायक म्हणून स्वीकारतील का…? अरे हा अभिनेता आहे ह्याला उगाच आणलंय स्पर्धेत असं तर म्हणणार नाहीत ना.. पण तुम्ही प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम, शुभेच्छा दिल्या.. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद दिलीत आणि गायक म्हणूनही मला स्वीकारलं त्यासाठी तुमचे ही आभार. असच प्रेम आणि आशीर्वाद देत रहा’.