हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट २०२४ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेते अजिंक्य देव यांच्या आई होत्या. सीमा देव यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होते. एक सोज्ज्वळ अभिनेत्री अशी त्यांची कायम ओळख राहिली. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे, तर देव कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सीमा देव यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं होतं. पतीच्या पश्चात वर्षभर त्यांची अवस्था नाजूकच होती. मात्र कुटुंबासोबत त्या भक्कम आधारासारख्या राहत होत्या. त्यांची दोन मुलं अजिंक्य देव, अभिनय देव आणि दोन सुना, नातवंडं असा मागे परिवार आहे. आधी वडील आणि त्यानंतर आईच्या निधनाने अजिंक्य देव मात्र पुरते कोलमडून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत अजिंक्य देव अत्यंत हताश निराश दिसत आहेत. मन खाली घालून ते एकटक पाहत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ती होती आणि आता ती नाही’. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अजिंक्य देव यांना धीर देणाऱ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘अजिंक्य सर, आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या आई सीमा देव, माझ्या आईच्या अत्यंत लाडक्या अभिनेत्री होत्या’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय की, ‘आईशिवाय जगणे खूप कठीण आहे…पण आई आपल्या सोबत आहे हे समजून घेऊया…आणि कल्पना करूया की ती आपल्या आजूबाजूला आहे…त्यामुळे आयुष्य थोडे सोपे होते…’