अभिमानास्पद!! ‘चंद्रयान- 3’चे यशस्वी प्रक्षेपण; मराठी कलाकारांकडून ISRO’च्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो- ISRO) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान- ३’ने यशस्वी प्रक्षेपण केले. या चंद्रयानाचे प्रक्षेपण हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून करण्यात आले. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. ‘चंद्रयान- ३’ने यशस्वी प्रक्षेपण केल्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. हाच आनंद आणि अभिमान व्यक्त करताना अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.

‘चंद्रयान- ३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर मराठी सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांनी विविध प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर पोस्ट, स्टोरी, मेसेजेस, व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. त्याने लिहिलंय, ‘ ”चंद्रयान- ३” ने यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ यांचा मला खूप अभिमान वाटतो. जय भारत. वंदे मातरम!’

तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेदेखील इंस्टावर व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘भारतापासून चंद्रापर्यंत’. ‘चंद्रयान- ३’ मुळे जगाला भारताचा अभिमान वाटेल’. याशिवाय अभिनेत्री गौतमी देशपांडेने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना लिहिले, ‘मला भारताचा अभिमान वाटतो’.

याशिवाय अभिनेत्री शिवानी बावकरने इंस्टाग्रामवर ‘चंद्रयान- ३’ च्या यशस्वी प्रक्षेपणाचा फोटो पोस्ट करताना लिहले, ‘भारताचे अभिनंदन’. तर व्हॉइस आर्टिस्ट आणि अभिनेत्री मेघना एरंडेने ‘भारतासाठी अभिमानाचा क्षण, चंद्रयान- ३. मेरा भारत महान’ अशा कॅप्शनसोबत पोस्ट शेअर केली आहे.

माहितीनुसार, ‘चंद्रयान- ३’ हे ‘चंद्रयान- २’चे फॉलो- अप मिशन आहे. ‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग करणे’ हा त्याचा उद्देश आहे. २०१९ साली ‘चंद्रयान- २’च्या मोहिमेदरम्यान ‘विक्रम’ या लँडरचे अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न ‘इस्रो’ने केला होता. यावेळी लँडरसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारा ‘रोव्हर’देखील धाडण्यात आला होता.

मात्र लँडर चंद्रपृष्ठावर कोसळला आणि विक्रम लँडरचे क्रॅश लँडिंग झाले होते. त्याचे अवशेष अमेरिकन अंतराळ संस्थेला तब्बल ३ महिन्यांनंतर सापडले. या मोहिमेच्या अपयशानंतर आता चार वर्षांनंतर ‘चंद्रयान- ३’ मोहिमेत लँडर आणि रोव्हर दक्षिण ध्रुवावर लँड करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी सर्व त्रुटी दूर करण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली आहे.