अहाहा!! नऊवारी साडी, केसात गजरा…; आयराची सावत्र आई किरण रावच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान लवकरच तिचा मराठमोळा मुलगा नुपूर शिखरेसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खानची लेक आयरा आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असून उद्या हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. अशातच आयराची सावत्र आई म्हणजेच किरण रावच्या मराठमोळ्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सावत्र लेकीच्या लग्नविधींसाठी आमिरची पूर्वपत्नी किरण राव होणाऱ्या जावयाच्या म्हणजेच नुपूर शिखरेच्या घरी पोहोचली होती. दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये किरण राव चक्क मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. आयरा आणि नुपूर शिखरेच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असताना आयराची आई रिना आणि सावत्र आई किरण राव दोघीही लग्नापूर्वीच्या विधींसाठी शिखरे कुटुंबीयांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी किरण रावने जांभळ्या रंगाची खण नऊवारी साडी नेसली होती. तर केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता. तिचा हा मराठमोळा लूक भारी चर्चेत आला आहे.

या व्हिडिओत किरण रावने विहीणबाईंना घट्ट मिठीदेखील मारल्याचे दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आला आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर हि जोडी उद्या अधिकृतरित्या लग्न बंधनात अडकणार आहे. उद्या ३ जानेवारी २०२४ रोजी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये पार पडणार आहे. यानंतर दोघेही पाहुण्यांना रिसेप्शन पार्टी देणार आहेत.