‘आई कुठे काय करते’ मालिकेची यशस्वी वाटचाल!! 1200 एपिसोड्स.. 4 वर्ष पूर्ण..; मधुराणीची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिकांमध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा कायम समावेश होतो. या मालिकेचे कथानक, पात्र, कलाकारांचा अभिनय सारं काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यामुळे गेली ४ वर्ष हि मालिका मनोरंजन करते आहे. २०१९ वर्षाच्या शेवटी सुरु झालेली हि मालिका २०२४ मध्येही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरने एक खास पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेला नुकतेच ४ वर्ष पूर्ण झाले आहेत. मालिकेचा १२०० वा भाग प्रसारित होणे हि एखाद्या कलाकारासाठी मोठी आनंदाची बाब असते. हाच आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना प्रेक्षकांची लाडकी अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. मधुराणीची ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. मधुराणी प्रभुलकरने या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने मालिकेतील सुंदर क्षण, मालिकेमुळे मिळालेले पुरस्कार असे काही प्रसंग शेअर केले आहेत.

या व्हिडीओ पोस्टसोबत मधुराणीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नवीन वर्षाची सुरुवात कृतज्ञतेने करत आहे. आज आम्ही १२०० भाग आणि ”आई कुठे काय करते” मालिकेचे ४ वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत…. हा किती सुंदर प्रवास… मनापासून कृतज्ञ वाटत आहे’. मधुराणीच्या या पोस्टवर प्रेक्षक, चाहते, नेटकरी आणि अनेक कलाकार मंडळींनि कमेंट करत मालिकेच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.