‘एका लावण्यवतीला बेभान नाचताना…’; सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीला मराठी अभिनेत्याचा Hats Off


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर गेली कित्येक वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सुरेखा पुणेकर या अत्यंत लोकप्रिय लावणी नृत्यांगना आहेत. आजही त्यांच्या अदाकारीचे लाखो चाहते आहेत. .. लागला का बाण..? असं जेव्हा जेव्हा त्या विचारतात तेव्हा तेव्हा कित्येक रसिक घायाळ झालेले असतात. नुकतंच बिग बॉस फेम अभिनेता अक्षय केळकरने सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी सुरेखा पुणेकर यांना लाईव्ह लावणी सादर करताना पाहून तो भारावून गेला आहे.

अभिनेता अक्षय केळकर याने सुरेखा पुणेकर यांच्या लावणीला दाद देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट अक्षय केळकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सुरेखा पुणेकरांबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अक्षयने सुरेखा पुणेकरांचे कौतुक केल्याचे दिसत आहे. यावेळी ‘लावण्य म्हणजे नक्की काय आहे..’ पासून ते ‘मी फक्त तुमचाच आहे’ इथपर्यंत बोलत अक्षयने लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आयुष्यात कधीच live लावणीचा कार्यक्रम पाहिला नव्हता… ‘ढोलकीच्या तालावर’ च्या निमित्ताने आमच्या सर्व contestants ना एकमेकांशी चढाओढ करताना पाहतो, पण ते नाचत असताना त्यांनाही आपण स्पर्धेत आहोत याची जाणीव असतेच. काल पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने एका लावण्यावतीला बेभान होऊन नाचताना पाहिलं. या लावण्यावतीला दाद देण्यासाठी समोर प्रेक्षक म्हणून जवळ जवळ ३००० महिला होत्या. त्या कलेचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला आणि त्या क्षणाचा मी साक्षीदार होऊ शकलो याचा मला खूप अभिमान आहे. आज पर्यंत तुमच्या विषयी खूप ऐकून होतो पण सुरेखा पुणेकरांना live नाचताना विंगेतून पाहिलं आणि खरंच माझ्यासाठी पर्वणी होती. सुरेखा ताई hats off’.