हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. बिग बॉसमधून प्रसिद्धी झोतात आलेला अक्षय ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवेदक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच्या सूत्रसंचालनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एक अभिनेता, निवेदक आणि एक उत्तम चित्रकार असलेला अक्षय सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करताना दिसतो. नुकतेच त्याने आपले राहते घर सोडल्याची माहिती देताना पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे.
अभिनेता अक्षय केळकरने त्याच्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो, त्याची आई आणि बहिण असे तिघेजण दिसत आहेत. इतकेच नव्हे तर यावेळी त्यांच्या हातात काही बॅगा पहायला मिळत आहेत. या व्हिडीओत त्याने कळव्याच्या घराचा फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ‘आम्हाला तुझी खूप आठवण येईल, पुन्हा एकदा, बाय कळवा घर’. तसेच अक्षयची बहीण श्रद्धाने या व्हिडिओला कॅप्शन देताना ‘घर आठवणी’ असे लिहिले आहे.
अक्षयच्या या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना अक्षयला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर एका चाहत्याने ‘आता कुठे जाणार..?’ विचारले असता यावर अक्षयची बहीण श्रद्धाने ‘मुंबई’ असे म्हटले आहे. तर अन्य एकाने ‘तुम्ही कळव्याचं घर सोडलं का..?’ असे विचारले असता त्यावर श्रद्धाने ‘हो’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘प्रत्येक दुःखद क्षण ही सर्वात आनंदाच्या क्षणाची सुरुवात असते……आनंदी रहा….बाप्पा तुम्हा सर्वांचे आशीर्वाद देवो….धन्यवाद…’