‘हा जो माज आहे ना, तो मी कमावलाय…’; ‘प्रतिशोध’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची’ या मालिकेतील शंतनु वर्दे हे पात्र तुफान गाजले. शंतनू वर्दे हि एका वकिलाची भूमिका होती. जी अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता. पण आता मालिकेतून या पात्राची एक्झिट झाली आहे. त्यामुळे अत्यंत भावुक होत अभिनेता अक्षय वाघमारेने मालिकेला, मालिकेच्या टीमला आणि मुख्य म्हणजे शंतनू वर्देला निरोप दिला आहे. भावनिक होत त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.

या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, “शंतनू वर्दे” रजा घेतोय… camps klub मधून गेल्या वर्षी एक फोन आला होता. नवीन मालिका सुरु करणार आहोत , तुला त्यात मुख्य भूमिका करायला आवडेल का? मालिकेचं नाव अजून ठरलं नाही हे सांगण्यात आलं होतं. वेळ न घालवता माझं उत्तर होतं “हो”.. Audition झाली, मी Select झालो आणि काही दिवसांनी मालिकेला नाव मिळालं. “ प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची “ज्या दिवशी या मालिकेसाठी माझी निवड झाली तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. सर्वप्रथम मी सोनी मराठी, सोहा कुलकर्णीचे आभार मानतो की त्यांनी इतका भन्नाट आणि मालिका विश्वात आजपर्यंत कधीही न आलेला विषय लोकांसमोर आणला. कॅम्प्स क्लब, राकेश सारंग, सारंग महिका, संगीता सारंग मॅमचे आभार की त्यांनी यात माझी निवड केली.

शंतनू वर्दे हे पात्र मला साकारायला मिळालं. खरं सांगू ? या क्षणी काय बोलतात किंवा काय बोलावं हे कळत नाहीये कारण उद्यापासून गोरेगाव ते मढ हा प्रवास प्रतिशोध साठी नसेल याचा विचार करताना सुद्धा कसंतरी होतंय. एक Connection झालंय या पात्राशी. या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांशी. त्यामुळे मनातून इथून बाहेर पडणं त्रासदायक आहे. २ दिवसांपूर्वी सेट वर माझा शेवटचा दिवस होता. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. माझा पाय निघत नव्हता सेट वरून… पण एकीकडून निघालो तरंच दुसरीकडे पोहचता येतं असा विचार केला आणि निघालो. माझ्यासाठी ही मालिका खूप जवळची आहे. यात काम करणाऱ्या कलाकारांसोबत घट्ट मैत्री कधी झाली कळलं नाही. काही जण तर जिवाभावाचे झाले. हे सगळे सोबत असतीलच आयुष्यभर.

शेवटी एवढंच म्हणेन तेही शेवटचं.. “हो मीच , Advocate शंतनू वर्दे . वयाच्या २८ व्या वर्षी हायकोर्ट गाजवणारा आणि आत्तापर्यंत एकही केस न हरलेला मी वकील आहे.. माझा हा जो माज आहे ना तो मी कमावलाय… आणि मी मरेपर्यंत तो माझ्या सोबत असेल.” Thank you so much for everything लवकरच परत भेटूयात… लवकरच पुन्हा काम करूयात.. मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येईल.. खूप प्रेम..’ अक्षयची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.