डॅडींचा जावई म्हणतोय, ‘आता खुर्ची आपलीच’; सत्ता संघर्षावर आधारित चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अचानक झालेला सत्ताबदल आणि अचानक बदललेलं सरकार उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे गेल्या काही काळापासून राज्यातील सत्तासंघर्ष हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे गेल्या काही काळात सत्तासंघर्षावर आधारित अनेक चित्रपट तसेच वेबसीरिज रिलीज झाले. ज्याला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. यानंतर आता आणखी एक चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ज्याचे नाव ‘खुर्ची’ असे आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे अत्यंत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अलीकडेच ‘खुर्ची’ या चित्रपटाचे अधिकृत मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. इतकेच नव्हे तर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा ठरली आहे. ‘वारसदार बाप ठरवत नसतो, वारसा तयार करावा लागतो… आता खुर्ची आपलीच!’ असे कॅप्शनमध्ये लिहीत अक्षय वाघमारेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर केले आहे. सत्तेच्या या राजकारणात खुर्ची कोणाची..? असे म्हणत या चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे. ज्यामध्ये सुरुवातीला निवडणुकीचा धुराळा उडालेला दिसत आहे. तर काही लोक हातात झेंडे घेऊन जल्लोष करताना दिसत आहेत.

मुख्य म्हणजे मोशन पोस्टरमध्ये बॅकग्राऊंडला दमदार संवाद आणि गाणी ऐकायला येत आहेत. जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची दिसते आहे. ढोल, ताशे आणि माणसांची गर्दी ज्यामध्ये सत्तेची ‘खुर्ची’ फार लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात अरुण गवळी (डॅडी) यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तर आर्यन, राकेश बापट, अभिनेत्री प्रीतम कागणे, अभिनेत्री श्रेया पासलकर, सुरेश विश्वकर्मा हे कलाकारदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाचे निर्माते संतोष कुसुम हगवणे आणि डॅडींची लेक योगिता गवळी आहेत.