पाठक बाईंनी केली जनजागृती; व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना दिली गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची माहिती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री अक्षया देवधर हि अजूनही घराघरांत पाठक बाई याच नावाने ओळखली जाते. प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अक्षया ‘अंजली पाठक’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झाली. तिच्या या भूमिकेनंतर तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्क साधताना दिसते. नुकतीच अक्षयाने एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत महिला वर्गात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

अक्षयाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडिओत अक्षया देवधर- जोशी सांगतेय कि, ‘सध्या सर्वत्र कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) आणि ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास होतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नेमका उपाय काय? याबद्दल आपल्याला कायम प्रश्न पडतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी भारताने स्वतःची लस विकसित केली आहे. या लसीचं नाव एचपीव्ही असं आहे. याचे सध्या तीन डोस उपलब्ध आहेत आणि हे संपूर्ण डोस महिलांना पूर्ण करावे लागतात. मला हे सांगताना अतिशय खेद वाटतो की, या लसीकरणाबाबत मला काहीच माहिती नव्हती. काही महिलांमध्ये आजही याबाबत जागृती निर्माण झालेली नाही’.

‘मला याबाबत माहिती मिळाल्यावर मी सर्वप्रथम हे डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच मी याचा दुसरा डोस घेतला. जास्तीत जास्त महिलांपर्यंत याची माहिती पोहोचणं गरजेचं आहे. माझा व्हिडीओ जर कोणी पुरुष पाहत असतील तर तुमच्या आजूबाजूच्या महिला, मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा. या लसीकरणाबाबत कोणतीही शंका किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संवाद साधा. वयाच्या ९ व्या वर्षापासून ही लस मुली घेऊ शकतात. त्यामुळे कृपया याकडे गांभीर्याने पाहा आणि जास्तीत जास्त मुलींना याची माहिती द्या’. अक्षयाने शेअर केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांसह अनेक मराठी अभिनेत्रींनीं लाईक केला आहे. तसेच अनेक महिलांनी अक्षयाने दिलेल्या माहितीसाठी तिचे आभार मानले आहेत.