हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या जोडीचे मोठ्या संख्येने फॉलोवर्स आहेत. झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून त्यांना राणा दा आणि पाठक बाई या भूमिकांमुळे प्रसिद्ध मिळाली. हि रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही तितकीच लोकप्रिय ठरली. लग्नानंतर हार्दिक- अक्षयाची पहिली मंगळागौर नुकतीच थाटामाटात पार पडली. या सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पहिल्या मंगळागौर समारंभात अक्षयाने नटण्याची हौस करून घेतली. पूजेसाठी तिने खास हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. सोबत हिरव चुडा, पारंपरिक दागिने, नाकात नथ, केसात गजरा असा तिने महाराष्ट्रीयन साजशृंगार केला होता. तसेच अक्षयाने दुसरी सोनेरी रंगाची साडी नेसली होती. सोबत हार्दिकने तिच्यासोबत कपल ट्विनिंग केलं होत. अक्षयाची पहिली मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंगळागौरीच्या खास कार्यक्रमात अक्षयाने आवर्जून लाडक्या नवऱ्यासाठी मस्त उखाणासुद्धा घेतला. तिच्या या उखाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मंगळागौरीच्या या खास कार्यक्रमात अक्षयाने हार्दिकसाठी उखाणा घेत म्हटले कि, ‘पावसाळा संपत आला… येईल आता हिवाळा, हार्दिकरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या कार्यक्रमात छान पार पडला मानसीचा सोहळा’. अक्षयाने या उखाण्यामध्ये नवऱ्यासह मानसी कानेटकर या तिच्या खास मैत्रिणीचेदेखील नाव घेतले आहे. अक्षयाने उखाणा घेताच उपस्थित प्रत्येकाने टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले. अक्षयाच्या पहिल्या मंगळागौरीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.