‘ती’ मुलगी आज ‘सुंदरा’ म्हणून… मालिकेने निरोप घेतल्यानंतर अभिनेत्रीची भावनिक पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या मालिकेतून ‘लतिका’ हे मध्यवर्ती पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक ही घराघरांत अन प्रेक्षकांच्या मनामनांत वसली आहे. २०२० साली या मालिकेतून अक्षयाने छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात शिरकाव केला. या मालिकेने अक्षयाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आज प्रेक्षक तिला अक्षया म्हणून कमी तर लतिका म्हणून जास्त ओळखतात. यामूळे भावुक झालेल्या अक्षयाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अक्षया नाईकने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. ज्यामध्ये अक्षया नाईक ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील इतर सहकलाकार अन तिच्या फॅमिलीसोबत दिसते आहे. यात ती मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झालेला टीव्हीवर पाहताना दिसतेय. इथे तिचे भरलेले डोळे तिच्या भावना स्पष्ट करत आहेत. या व्हिडीओमध्ये पुढे अक्षया नाईक बोलताना दिसते आहे कि, ‘आता रस्त्याने जाताना सगळे लोक, लहान मुलं, आजी- आजोबा अगदी सगळेच मला ‘’सुंदरा’’ या नावाने हाक मारतात. हे ऐकून खरंच खूप छान वाटतं’.

तसेच या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘ती खूप ‘’सुंदर’’ आहे, हे मान्य करण्यासाठी जी मुलगी संघर्ष आणि धडपड करत होती. ती मुलगी आज ‘’सुंदरा’’ म्हणून ओळखली जाते. लतिका माझ्या कायम जवळची असेल. लतिकाला खूप प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार’. कलर्स मराठी वाहिनीची ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेमध्ये अक्षया नाईकसह समीर परांजपे, प्रणव प्रभाकर, पूजा पुरंदरे, ऋषिकेश शेलार, कुणाल धुमाळ, गौरी किरण या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.