‘आमचं छोटंसं घर आता तुमचं झालं…’; छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा’ने गोव्यात सुरु केला ‘हा’ व्यवसाय


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अभिनयासह अन्य क्षेत्रात पदार्पण करत प्रगतीचे पाऊल टाकले आहे. यामध्ये प्राजक्ता माळी, निरंजन कुलकर्णी, अनघा अतुल, प्रार्थना बेहेरे, अभिज्ञा भावे अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये आता छोट्या पडद्यावरील सुंदरा म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. अक्षया मूळ गोव्याची असल्यामुळे तिने बहिणीसोबत हॉटेल क्षेत्रात पदार्पण करत गोव्यातील सुंदर बंगल्याचे होम स्टे मध्ये रूपांतर केले आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

अभिनेत्री अक्षया नाईकने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘गोव्यातील आमचं छोटंसं घर आता तुमचं झालं आहे. रोजच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन तुम्ही येथे निवांत सुट्टीचा आनंद घेऊ शकता. आमच्या ”नाईक होम स्टे” मध्ये आजपासून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमचं हे घरगुती हॉटेल पणजीपासून ८ किलोमीटर दूर आणि करमाळी रेल्वे स्थानकापासून फक्त ३.२ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या घरात स्वागत करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतेय…’.

अक्षया नाईकच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षयाच्या या नव्या व्यवसायासाठी तिचे चाहते शुभेच्छा देत आहेत. तर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये ‘नाईक होम स्टे’च्या एका दिवसाच्या भाडेदराची चौकशी केली आहे.

अभिनेत्री अक्षया नाईकच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, कलर्स मराठीच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तिने लतिका हि मुख्य भूमिका साकारली होती. जी प्रचंड गाजली. यानंतर आता अक्षयाने ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केले आहे.