हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण आहे. कारण सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची मंदीरात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या साठी अवघी अयोध्या नगरी सजली होती. नुसती अयोध्या नगरी नव्हे तर संपूर्ण देशभरात या स्वप्नपूर्तीचा आनंद आणि उत्साह पहायला मिळतोय. सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘हे राम’ भजनाचे गायन केले आहे. या गाण्याला श्रोते मंडळींची पसंती मिळाली आहे.
अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासोबत हे गाण गायले आहे. याबाबत अमृता फडणवीस यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हे गाणं ऐकण्यासाठी लिंकदेखील शेअर केली आहे. अमृता फडणवीस यांनी एक्स आणि फेसबुक हॅण्डलवर पोस्ट करत म्हटलं की, कैलाश खेर यांच्यासोबत ‘हे राम’ भजन गायलं आहे. भजन गायनामुळे सुखद आनंदाची अनुभूती आली. राममय भारतवर्षात रामभक्तीवर गायनसेवा करण्याचा सौभाग्य मला मिळालं आहे’.
यानंतर आजच्या शुभप्रसंगी अमृता फडणवीस यांनी भावना व्यक्त करताना म्हटले कि, ‘अयोध्येत रामल्ला विराजमान होत आहेत ही सुखाची बाबा आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होत आहे. योग्य निर्णय घेतल्यामुळे राम मंदिर झालं आहे. सगळ्या राम भक्तांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे’. दरम्यान अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आणखी एका आगामी गाण्याची मोठी घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे हे गाणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर या गाण्याला प्रसिद्ध संगितकार अजय आणि अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे.