हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयासह, नृत्य कलेसाठी नेहमीच चर्चेत असते. अमृता जितकी उत्तम अभिनेत्री आहे, तितकीच उत्तम नृत्यांगना. नुकताच अमृताने ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ म्हणजेच NCPA’च्या भव्य सभागृहात आपला नृत्याविष्कार सादर केला आहे. या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या कथक नृत्याच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमृताने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘आयुष्यात अशा संधी मिळाल्या की, फारच छान आणि कृतज्ञ वाटते. कधी कधी तो आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. मी माझ्या आयुष्यात पहिले कथक नृत्य ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये सादर केले. यावेळी मला ७५ नृत्यागणांनी साथ दिली. पियुषराज आणि शुभदा यांचे या नव्या प्रवासासाठी मनापासून आभार…माझ्या गुरुंनी आठवडाभर मला जी शिकवण दिली त्यामुळे मी खरंच भारावून गेले. मला समजून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद…हा नक्कीच माझ्या नृत्य विश्वातील नवा शुभारंभ होता’.
अभिनेत्री अमृता खानविलकरने या पोस्टमध्ये तिच्या नृत्याच्या नव्या प्रवासात लाभलेल्या प्रत्येक साथीदाराचे आभार मानले आहेत. यासाठी तिला ज्यांनी मार्गदर्शन केले, जे गुरु लाभले त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. अमृताच्या या व्हिडिओवर अनेक नेटकरी, चाहते आणि कला विश्वातील मंडळींनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. तसेच अमृताला तिची कला जोपासण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यंत अमृता खानविलकरने ‘नच बलिए’, ‘झलक दिखला जा’ यांसारख्या शोमध्ये आपल्या नृत्य कलेची झलक दाखवली.