पैसा वसूल!! ‘RRKPK’साठी अमृता खानविलकरची पोस्ट; रणवीर- क्षितीचे कौतुक करत म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपट निर्माता कारण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. शिवाय या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग ही रॉकी रंधावा म्हणजेच रणवीरच्या आईची भूमिका साकारताना दिसतेय. यासाठी क्षितीचे सर्वत्र कौतुक केले जात असताना आता अमृता खानविलकरने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्री क्षिती जोगने ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या सिनेमात रणवीर सिंग साकारत असलेल्या रॉकीच्या आईची भूमिका साकारली आहे. जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र यांच्यासारख्या बॉलिवूडच्या बड्या कलाकारांमध्ये क्षिती आपल्या भूमिकेतून स्वतःची एक वेगळी छाप सोडताना दिसते आहे. त्यामुळे क्षितीच्या भूमिकेत मराठी सिनेविश्वातच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातील दिग्गज मंडळींकडून विशेष कौतुक केले जात आहे. दरम्यान क्षिती जोगची आणि रणवीर सिंगची खास मैत्रीण अभिनेत्री अमृता खानविलकरने या चित्रपटाचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच तिच्या आईसह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा पाहिला. रणवीर आणि क्षिती तिचे चांगले मित्र असल्यामुळे चित्रपटातील काही सीन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने या दोघांचे कौतुक केले. अमृताने लिहिलंय, ‘करण जोहर सर पैसा वसूल आणि मनोरंजन करणारा चित्रपट तुम्ही बनवला आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केले आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट तुम्हा दोघांनाही भरभरून प्रेम! शेवटी आमच्या लाडक्या क्षिती जोगला सांगेन, अगं काय कमाल काम केलं आहेस यार..’.

अमृताची स्टोरी रिशेअर करत क्षितीने यावर हार्ट इमोजी शेअर केला आहे. दरम्यान चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर आणि क्षितीच्या नवऱ्याने म्हणजेच मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही तिच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.