हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. शिवाय विविध विषयांवर आपले मत बिंधास्त व्यक्त करताना दिसतात. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी. तो कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत प्रकट करत असतो. आजही त्याने वृक्षतोडीसंदर्भात शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
जितेंद्र जोशी आपल्या कविता आणि लेखणीच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या विविध गंभीर विषयांवर भाष्य करताना दिसतो. केवळ अभिनय विश्वात नव्हे तर तो अनेक सामाजिक उपक्रमांमध्येदेखील सक्रिय असतो. ‘पाणी फाऊंडेशन’, ‘नाम’ यांसारख्या संस्थांसाठी जितेंद्र जोशी काम करतो. निसर्गाविषयी असणारे प्रेम आणि कृतज्ञता तो कायम व्यक्त करतो. दरम्यान महामार्ग निर्मिती केली जात असताना त्यासाठी केली जाणारी वृक्षतोड अमानवीय असल्याचे म्हणत अभिनेता जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता जितेंद्र जोशीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत त्याने लिहिलंय, ‘महामार्ग निर्माण करताना झाडांची कत्तल करणाऱ्या लोकांना आपल्या पुढच्या पिढ्या गुदमरताना दिसत नाहीत. झाडांची अमानुष हत्या होऊ देणारे आपण सुद्धा निर्वंश होऊन मारून टाकले जाणार आहोत. आताच आपापल्यासाठी डांबर तयार ठेवू त्याच रस्त्यांखाली झाडांच्या मृतदेहासोबत झोपी जाण्यासाठी’. जितेंद्रची ही सणसणीत पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायला होत आहे.