‘माझं बॅगेज 4 दिवसांपासून गायब..’; प्रसिद्ध एअर लाईन्सच्या बेजबाबदार सर्व्हिसचा अभिनेत्याला मनस्ताप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावने विविध चित्रपटांमधून कायम वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या कित्येक भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘पोश्टर बॉईज’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अनिकेतने अव्वल भूमिका साकारल्या आहेत. केवळ चित्रपट नव्हे तर मालिका आणि नाटकांमध्येही त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं आहे. दरम्यान अनिकेतने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका संतापजनक घटनेचा उलगडा केला आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासरावला नुकताच एक संतापजनक अनुभव आला आहे. अभिनेत्याचं सामान एअरपोर्टवरुन बेपत्ता झालं असून याबाबत त्याने वारंवार तक्रार करुनही त्याचं सामान त्याला परत मिळालेलं नाही. याबाबत त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्याने विमान तिकीटाचे आणि सामानाचे फोटो पोस्ट केले आहेत. सोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘प्रिय दोन निष्काळजी विमान सेवा. @vistara @vistaraairlines आणि @united…. माझे चेक- इन बॅगेज गेल्या 4 दिवसांपासून गायब आहे. तुमच्या बाजूने एकच प्रतिसाद होता फक्त खोटी आश्वासने आणि दिशाभूल. या 4 दिवसात तुम्ही माझ्या बॅगचा मागही काढू शकला नाहीत’.

अनिकेतने पुढे म्हटलंय, ‘फक्त माफीचा ईमेल माझ्या समस्येचे निराकरण करणार नाही. तुमच्या व्यावसायिकतेच्या अभावामुळे आणि तुमच्या प्रवाशांबद्दलच्या सहानुभूतीच्या अभावामुळे मला खूप त्रास होत आहेत. मला आशा आहे की ही पोस्ट पाहिल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता कराल. मी एक प्रोफेशनल अभिनेता आहे. या इंडस्ट्रीत गेल्या २४ वर्षांपासून काम करत आहे आणि मला असा कधीच अनुभव आला नाही. मी माझे “प्ले कॉस्ट्यूम”देखील बॅगेत घेऊन जात असल्याने माझ्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. फाइल संदर्भ क्रमांक:– EWR98426M. मला आशा आहे की भविष्यात कोणीही अशा समस्येचा सामना करणार नाही’. या पोस्टनंतर आशा आहे कि, अनिकेतच्या समस्येवर तोडगा निघेल आणि त्याच्या समस्येचे समाधान होईल.