हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पवित्र रिश्ता’ फेम मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकिताच्या वडिलांचे १२ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले आणि त्यानंतर अभिनेत्री पूर्ण कोलमडून गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे बाबा आजारी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर १३ ऑगस्ट २०२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर अंकिताने सोशल मीडियावर माध्यमातून एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणीत अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. अंकिता इतर कुणाहीपेक्षा तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. त्यामुळे कोलमडलेल्या अंकिताने इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ जोडून तयार केलेला कोलाज व्हिडीओ शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे.
सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय,’पप्पा, मी तुमचे वर्णन शब्दात करू शकत नाही. पण एवढेच सांगू इच्छिते की, मी माझ्या जीवनामध्ये तुमच्यासारखा मजबूत, उत्साही आणि मोहक व्यक्तीमत्त्व असलेली व्यक्ती पाहिलेली नाही. तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर मी तुमच्याबद्दल खूप काही जाणू शकले. तुम्हाला भेटायला आलेले सगळे लोकं फक्त तुमचीच स्तुती करत होते. तुम्ही कशाप्रकारे त्यांना रोज ‘गुड मॉर्निंग’ मेसेज पाठवतात, त्यांना कॉल करतात किंवा एखाद्याची आठवण आल्यावर त्याला न विसरता व्हिडीओ कॉल करता, हे सांगताना सर्वांनीच तुमची आठवण काढली. तुम्ही प्रत्येकासोबत नातं इतकं जिवंत ठेवलं होतं, आता मी पण तुमच्या स्वभावासारखी कशी आहे? त्या प्रश्नाचं उत्तर मला आता कळालं. तुम्ही मला चांगलं आयुष्य, कधीही न विसरणाऱ्या आठवणी आणि नातेसंबंधांविषयी खूप चांगली समजूत दिलीत’.
पुढे लिहिलं, ‘तुम्ही मला कधीच हार मानायला शिकवलं नाही. राजासारखं कसं जगायचं ते तुम्ही शिकवलंत आणि मला उडण्यासाठी पंख दिले. मी तुम्हाला वचन देते की तुम्ही सदैव माझ्यासोबत राहाल. तुम्ही मला तुमची काळजी घेण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी आणि आई फक्त हाच विचार करतोय की आता आपण रोज उठून नेमकं काय करायचं? कारण तुमच्यामुळे आम्ही सतत जागरूक राहायचो. पप्पांचं जेवण, पप्पांचा नाश्ता.. हे सर्व विचार डोक्यात सतत असायचे. पण आता तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे करण्यासारखं असं काहीच उरलं नाही. आम्हाला अधिकाधिक मजबूत बनवल्याबद्दल धन्यवाद बाबा’.
‘तुम्ही फार भाग्यवान होता, त्यामुळे तुम्हाला आईसारखी बायको मिळाली. तिने तुम्हाला सर्वस्व दिलं. तुम्हीसुद्धा तीच्यावर भरभरून प्रेम केलं. मी तुम्हाला वचन देते की आम्ही तिची आधीपेक्षाही अधिक काळजी घेऊ, तिला सर्व आनंद देऊ, तिचे पूर्वीपेक्षाही अधिक लाड करू. तुम्ही दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी आणि मला घडवल्याबद्दल धन्यवाद. मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहीन’. आपल्या आयुष्यात आई- वडील खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याची संधी तुम्हाला मिळाल्यास ती गमावू नका. एकदा गेलेली व्यक्ती परत कधीच येत नाही. म्हणून त्यांना सर्वस्व द्या, आनंद, वेळ, काळजी, प्रेम.. सर्व काही द्या. त्यांना फक्त हेच हवं असतं’, असा सल्लादेखील तिने चाहत्यांना दिला आहे.