यांना देव कसं म्हणायचं..?; कोकण हार्टेड गर्लने उघड केला KEM हॉस्पिटल यंत्रणेचा हलगर्जीपणा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी इंस्टाग्राम इन्फ्लूएंसर अंकिता वालावलकरने तिच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने मुंबई, परळमधील नामवंत सरकारी हॉस्पिटल केईम मधील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळीकडे याबाबत चर्चा होऊ लागली आहे. अंकिताचा मित्र किरण चव्हाण याच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्याला सिंधुदुर्ग येथून थेट केइएम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जे घडलं ते अगदीच चूक आणि धक्का देणारं होतं.

अंकिताच्या मित्राला किरणला १४ जून २०२३ रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र पूर्ण दिवसभर त्याच्याकडे एकही डॉक्टर फिरकला नाही का त्याच्यावर कोणतेही आवश्यक ते उपचार झाले नाहीत. ही गोष्ट समजताच अंकिता तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिने याबद्दल संबंधितांकडे विचारपूस केली. अखेर काहीही सकारात्मक हालचाल न दिसल्याने तिने मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांच्याशी संपर्क साधला.

यानंतर अमेय खोपकर स्वतः हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी वरच्या पट्टीत हॉस्पिटलच्या प्रभारींचा समाचार घेतला. यानंतर काही क्षणात सूत्र हलली आणि किरणवर उपचार सुरू झाले. या सगळ्या प्रकारात हॉस्पिटलची सिटीस्कॅन मशीन बंद होती असेही समोर आले. ‘कोमामधे असलेल्या रुग्णाला तुम्हीच बाहेर घेउन जा आणि रिपोर्ट घेऊन या’, असे सांगितले गेले. ज्यामुळे अंकिताच्या मित्राचं बाहेरून सिटीस्कॅन केलं गेलं.

याबाबत बोलताना अंकिता म्हणाली कि, ‘हा प्रश्न फक्त माझ्या एकटीच्या रुग्णाचा नाहीये. इथे कित्येक रुग्ण आहेत आणि डॉक्टर खूप कमी आहेत. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नर्सेसची सुद्धा हीच परिस्थिती आहे. मी इतर रुग्णांना विचारल्यावर त्यांनाही चांगली वागणूक मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून हॉस्पीटलची परिस्थिती किती वाईट आहे असं दिसतंय. असं असेल तर हॉस्पीटल डॉक्टरांच्या रिकाम्या जागा का भरत नाही..?’ असा सवाल करत अंकिताने संताप व्यक्त केला आहे. यावर रुग्णालयातील प्रभारी अधिष्ठाता यांनी अंकिताला तिच्या रुग्णाचा सिटीस्कॅन बाहेरून करावा लागला म्हणून ती त्याचा राग काढतेय असे व्हिडिओतून म्हटले आहे. एकूणच या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाची चूक उघडकीस आल्याने आता यावर पडदा टाकण्यासाठी वाट्टेल ते बोलले जात असल्याचे स्पष्ट आहे. केवळ अंकिताच नव्हे तर, रुग्णालयातील अन्य अनेक रुग्णांच्या बाबतीत असा हलगर्जीपणा डॉक्टर, नर्सेस करत असल्याचे वारंवार समजत आहे. अशावेळी डॉक्टरांना देव म्हणायचं कसं..? हा सवाल उपस्थित राहणे स्वाभाविक आहे.