हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील प्रसिद्ध कॉमिक अभिनेता अंशुमन विचारे हा ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. नाटक, मालिका तसेच चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत त्याने स्वतःची विशेष छाप सोडली. अंशुमन सोशल मीडियावर फार सक्रिय असतो आणि य माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच अंशुमनने शेअर केलेली एक व्हिडीओ पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने स्वतःला आलेला एक अनुभव शेअर केला आहे.
दररोजच्या धावपळीत आपण एखादी वस्तू कुठे ना कुठे विसरण्याची शक्यता असते. असे अनेक अनुभव तुम्हालाही आले असतील आणि असाच एक अनुभव अंशुमनला आला. जो त्याने या पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. प्रवास करतेवेळी अंशुमनचा मोबाइल फोन पडला. आता तो पुन्हा मिळण्याची शक्यता फार कमी होती. पण एका रिक्षा चालकाला हा फोन सापडला आणि त्याने अंशुमनला तो परत केला आहे. हा अनुभव शेअर करण्यासाठी अंशुमनने हि खास पोस्ट शेअर केली आणि ‘अशी प्रामाणिक माणसं ह्या जगात आहेत… म्हणून माणुसकी अजूनही जिवंत आहे’ असं कॅप्शन दिलं आहे.
अंशुमन विचारे आणि त्याची पत्नी पल्लवी या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत, ‘आमचे एक दादा आहेत राकेश साळवी. माझा फोन पडला होता आणि या दादांना तो फोन सापडला. त्यांनी माझ्या बायकोला फोन करून याबद्दल माहिती दिली. एवढंच नाहीतर त्यांनी तो फोन आम्हाला आणून सुद्धा दिला. आजच्या काळात एवढी मदत करणं ही खूप मोठी आहे. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून जग चालतंय. पैसेवाले देखील एवढं चांगलं वागत नाहीत त्यामुळे आपण सामन्यांकडून काय अपेक्षा करणार..? पण, तुम्ही खरंच ग्रेट आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवणार आहोत. थँक्यू दादा!’. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत रिक्षा चालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहेत.