अरुंधती उचलणार अनिरुद्धवर हात; लगावणार सणसणीत कानफाडाट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा टीआरपी गेल्या काही महिन्यात घसरताना दिसला. अरुंधतीचं लग्न झाल्यानंतर मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पचनी न पडल्याने टीआरपी रेसिंगमध्ये सर्वात पहिली असणारी हि मालिका हळूहळू खाली सरकली. आतापर्यंत मालिकेत अरुंधतीच लग्न, संजना अनिरुद्धची भांडणं, अरुंधतीच्या लेकाचा आत्महत्येचा प्रयत्न आणि आशुतोषची बहीण वीणाची एंट्री असे मोठे ट्विस्ट घडले. पण आता मालिकेत जो ट्विस्ट येणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील खडबडून जागे होतील.

आतापर्यंत आपण मालिकेत अरुंधतीला अत्यंत नम्र, सोशिक, समजूतदार आणि प्रसंगी खंबीर असे पाहिले आहे. पण यावेळी आपण अरुंधतीचा एक वेगळाच अवतार पाहणार आहोत. आजपर्यंत तिने अनिरुद्धच्या प्रत्येक वाईट वागण्याकडे दुर्लक्ष केले, अनेकदा स्वतः अपमान पचवला पण त्याचा मान राखला. पण यावेळी अरुंधती अनिरुद्धला त्याची जागा दाखवून जमिनीवर आणणार आहे. वीणाचा मोबाईल चोरून तिचे आणि तिच्या पतीचे प्रायव्हेट व्हिडीओ, मेसेज पाठवून तिला धोक्यांचे मेसेज पाठवणारा अनिरुद्ध आपली चाल खेळून यात नितीनला अडकवतो. त्याचा कांगावा पाहून आशुतोष देखील मित्रावर संशय घेतो आणि त्याच्यावर हात उगारतो.

यानंतर अरुंधती आशुतोषला समजावण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकत नाही. एकीकडे तर अनिरुद्धचा प्लॅन यशस्वी झाला आहे. पण अरुंधतीला या प्रकारामागे अनिरुद्धचा हात असल्याची पूर्ण खात्री आहे. दरम्यान नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो कि अनिरुद्ध चढ्या आवाजात बोलतो कि, ‘या माणसाने वीणाला छळलय.. या माणसाला आज मी धक्के मारून माझ्या घराबाहेर काढणार आहे’. इतक्यात अरुंधती मध्ये पडते. यावेळी अरुंधती अनिरुद्धला थांबवताना त्याच्या कानशिलात लगावते. यावर अनिरुद्ध तिला ‘तुझी हिम्मत कशी झाली..?’ असे म्हणत तिच्यावर हात उचलू लागतो. तर अरुंधती त्याचा हात धरते आणि म्हणते, ‘एकाही नात्याचं पावित्र्य जपता आलं नाही तुम्हाला. म्हणून इतरांच्या नात्यामध्ये विष कालवायला निघालात..?’ या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये तो पाहण्याची उत्सुकता आहे.