हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी छोटी आर्या आंबेकर आज प्रसिद्ध गायिका झाली आहे. केवळ गायिका म्हणून नव्हे तर ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रातदेखील पदार्पण केले. इतर सेलिब्रिटी मंडळींप्रमाणे आर्य आंबेकर देखील सोशल मीडियावर सक्रिय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत मात्र मोठा स्कॅम समोर आणला आहे.
गायिका आर्या आंबेकरने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर एक पोस्ट शेअर करत तिच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं फुटेज आणि ऑडिओ तिच्या परवानगीशिवाय वापरल्यामुळे जाहीरपणे संताप व्यक्त केला आहे. आर्या आंबेकरने लाइव्ह कार्यक्रमांमध्ये गायलेली गाणी काही लोकांनी रेकॉर्ड करून विविध युट्यूब चॅनल्सवर पोस्ट केली आहेत. तेही तिच्या परवानगीशिवाय. याबद्दल आर्या आंबेकरने पोस्ट शेअर करून संगीतकार आणि गायकांना सतर्क करीत या युट्यूब चॅनेल्स विरोधात कॉपीराईटचा दावा करण्याचा प्रयत्न केलाय.
परंतु, तिच्याकडे मूळ कार्यक्रमांचे व्हिडीओ नसल्याने ती काही करु शकली नाही. मग अशावेळी यावर तोडगा कसा काढायचा..? असा सवाल तिने या माध्यमातून केला आहे. इंग्रजी भाषेचा वापर करून आर्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून आर्याच्या चाहत्यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे.
मात्र काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ इंग्रजीत असल्यामुळे आर्याला ट्रोल केले आहे. या ट्रोलर्सला आर्याने उत्तर देत म्हटले, ‘जी जी लोकं मी मराठीत बोलले नाही म्हणून नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांना सांगावंस वाटतंय, मला तुमच्या भावना कळताहेत, पण माझ्याबरोबर झालेली ही फसवणूक इतर भाषेतल्या सुद्धा कुठल्याच गायकांबरोबर व्हायला नको असं मला मनापासून वाटतं… आणि त्यासाठीच सगळ्यांना कळेल अशा इंग्रजी भाषेत मी व्हिडिओ बनवला.
हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू प्रत्येक संगीतकाराला अलर्ट करणे हा होता. तरीही तुमच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून मी सॉरी म्हणते. तुम्ही सुद्धा मुख्य मुद्दा काय आहे ते समजून घेतलंत तर मला बरं वाटेल’. दरम्यान, आर्याच्या तक्रारीची दखल घेत काही नामांकित म्युझिक कंपन्यांनी आर्याचे कॉपीराईट असलेली गाणी ताबडतोब काढून टाकली आहेत. याबद्दल तिने आभार मानले आहेत.