‘एक चांगला माणूस, चांगला मित्र गेला..’; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रवींद्र गेल्या ७ ते ८ महिन्यापासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे एकटेच भाडेतत्वावर राहत होते. याच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाचे दुःख हे मराठी कलाविश्वाला हादरा देणारे आहे. अनेक दिग्गज मंडळींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीदेखील मित्र रवींद्र महाजनी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

एका नामवंत वाहिनीशी बोलताना अशोक सराफ यांनी म्हटले कि, ‘खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केलेत. आम्ही यशस्वी चित्रपट केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होतंय. एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा असा तो नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण.. तो प्रत्येक भूमिका अगदी उत्तम करायचा. जे काही करायचा ते मन लावून करायचा आणि म्हणूनच तो त्या काळातला एक यशस्वी नट होता’.

अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मराठी सिनेसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘झुंज’ या मराठी चित्रपटाद्वारे सिनेक्षेत्रात पदार्पण केले होते. अतिशय देखणे आणि गुणी असे ते अभिनेते ठरले. रवींद्र महाजनी हे मराठी चित्रपट सृष्टीतील ‘विनोद खन्ना’ म्हणून ओळखले जायचे. ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.