‘बाईपण का भारी हे दाखवायला लोक पुढे येतील, पण पुरुषांचं भारीपण…’; अशोक सराफ यांचं वक्तव्य चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिस, सोशल मीडिया, प्रसार माध्यमे सर्वत्र केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या रिलीजला चार आठवडे होऊन गेले पण प्रतिसाद अजूनही दणदणीत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसतोय. इतकंच काय तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दरम्यान प्रेक्षक. समीक्षक आणि सिनेविश्वातील दिग्गज मंडळी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेते अशोक सराफ यांनीदेखील चित्रपटाबाबत आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

बाईपण भारी देवा’ या चित्रपटात ६ बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळणारे यश हे थक्क करणारे आहे आणि हे यश साजरे करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीदेखील हजेरी लावली होती. दरम्यान इतरांप्रमाणे अशोक सराफ यांनादेखील ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अशोक सराफ यांनी अगदी स्पष्ट आणि अत्यंत बोलकी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक सराफ यांनी म्हटले कि, ‘बाईपण का भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील. पण, पुरुषांचं भारीपण कोणीही दाखवणार नाही. पुरुषांचं भारी पण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कधीच कुणी गवगवा करत नाही. स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना, दु:ख मैत्रिणींसमोर किंवा नवऱ्यासमोर व्यक्त करत असतात. पण, पुरुष मंडळी यावर कायम मौन बाळगून असतात. आपली दुःख, त्रास, आर्थिक संकटं ती कधीच कोणासमोर उलगडताना दिसत नाहीत आणि त्यावर कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातात’. अशोक सराफ यांच्या वक्तव्याला आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसत आहे.