‘मोठी जबाबदारी…’; आगामी चित्रपटात अश्विनी महांगडे साकारणार ‘हि’ ऐतिहासिक भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अनघा’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे कायम चर्चेत असते. अभिनय विश्वात आघाडीवर असणारी अश्विनी महांगडे केवळ अभिनेत्री नसून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे एक उमदा व्यक्तिमत्व आहे.

अश्विनीच्या विविध भूमिकांवर प्रेक्षक कायम प्रेम करत आले आहेत. अशातच आता अश्विनी एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. माहितीनुसार, राणू अक्का साकारल्यानंतर आता येत्या काळात अभिनेत्री अश्विनी महांगडे हि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे काही दिवसांपूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात अत्यंत महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. यानंतर आता तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. तिने या पोस्टमध्ये काही फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘पुण्यश्लोक धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर. या चित्रपटासाठी पहिली मीटिंग झाली आणि ही व्यक्तिरेखा, मोठी जबाबदारी मी स्वीकारली. रसिक मायबाप प्रेक्षक हो तुमच्या आशीर्वादाची गरज आहे’.

अश्विनीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आगामी चित्रपटासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अश्विनीने ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या चित्रपटाची अधिकृतरीत्या घोषणा केली होती. यामध्ये आपण प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचेही तिने तेव्हाच सांगितले होते. माहितीनुसार, या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुशांत सोनावले करणार आहेत. तर चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सोमनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आहे. तसेच हा चित्रपट येत्या २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे.