‘मुंबई’ने आपलं म्हटलं बुवा..!! मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला लागलं म्हाडाचं घर; शेअर केला Video


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासारने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाची बातमी शेअर केली आहे. नुकताच तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. ज्याची पहिली झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडिओत अश्विनी तिच्या कुटुंबीयांसोबत नव्या घरात पूजा करताना दिसते आहे. माहितीनुसार, अश्विनीला म्हाडाचं घर लागलं असून हे तीच पहिलं आणि हक्काचं घर आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी ४’चा विजेता अक्षय केळकरला म्हाडाचं घर लागल्याचे समोर आले होते. यानंतर आता म्हाडामुळे अश्विनीची स्वप्नपूर्ती झाली आहे.

मराठी अभिनेत्री अश्विनी कासारने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यामध्ये तिने शेअर केलेल्या व्हिडीओत ती तिच्या कुटुंबीयांसोबत नव्या घरात पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलंय कि, ‘आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे आणि काम करतोय त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं… हे एकतर स्वप्न आहे किंवा कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय… खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांनाही सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच. काही वर्षांपूर्वी बदलापूरपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या (आणि आता माझ्याही) कुटुंबियांनी, नातेवाईकांनी मला घराची उणीव कधी जाणवू दिली नाही. नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं’.

‘त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे. रात्री बेरात्री केलेला प्रवास, तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय. सगळं ‘Worth’ वाटतंय. आता कंबर कसून जास्त छान काम करू ही ताकद या घराने दिली आहे. ‘मुंबई’ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं असं काहीसं वाटतंय… माझं घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा आणि महाराष्ट्र शासनाचे आभार… तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असू… भावना समजून घ्याल याची खात्री आहे…’. अश्विनीच्या या पोस्टवर चाहते, नेटकरी आणि कलाविश्वातीळ अनेक मंडळींनी कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.