हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जुन्या वर्षाचा निरोप घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी नव्या वर्षात नवी स्वप्न, नवी आशा, नवी उमेद आणि नवे संकल्प केले असतील. प्रत्येकाच्या नव्या वर्षाची सुरुवात काही वेगळी झाली असेल. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अश्विनी महांगडेने नव्या वर्षात एक खास संकल्प केला आहे. ज्यासाठी तिचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. चला तर जाणून घेऊया अश्विनीच्या संकल्पाविषयी..
अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिचा बॉयफ्रेंड निलेश जगदाळे आणि तिच्या कुटुंबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत अश्विनी कोल्हापूरच्या ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत अश्विनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना तिच्या नवीन वर्षाचा संकल्प सांगितला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘इंग्रजी नवीन वर्षात काय नवीन संकल्प करावा बरं..? असे मनात आले आणि आम्ही संकल्प केला की महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं, मंदिर, गड – किल्ले यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. सुरुवात केली ……. १. जोतिबा मंदिर, कोल्हापूर’.
नव्या वर्षातील अश्विनीचा हा अनोखा संकल्प नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे. अनेकांनी यासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अश्विनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर, काही महिन्यांपूर्वीच तिने निलेशसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला.
निलेश हा व्यावसायिक आहे आणि The Farmotsav या दूध उत्पादक संबंधी कंपनीचा तसेच FLYING ANGEL या ब्युटी प्रॉडक्ट कंपनीचा तो फाऊंडर आहे. इतकेच नव्हे तर मोरया प्रॉडक्शनच्या माध्यमातुन तो गाणी आणि सिनेमांची निर्मिती करतो. लवकरच अश्विनी आणि निलेश लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे.