हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते. सामाजिक, आर्थिक, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित किंवा वैयक्तिक आयुष्याशी निगडित पोस्ट शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतीच अश्विनीने एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या आज्जीच्या निधनाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये अश्विनीने तिच्या आजीसोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत. जे पाहून अश्विनी आणि तिच्या आज्जीचं नातं किती घट्ट आणि उबदार मायेचं होतं याचा अंदाज येतोय.
अश्विनी महांगडे तिच्या आज्जीच्या फार जवळ होती. त्यामुळे आज्जीच्या निधनाने अश्विनी फार निराश झाली आहे. तिने हि पोस्ट शेअर करताना लिहिलंय, ‘आजी…फक्त प्रेमाचा साठा…पण भारी शिस्तीची… सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी. एक काळ असा होता जेव्हा प्रचंड हाल सोसले पण कल्पतरूसारखी खंबीर उभी राहिली. माझे आणि बाबांचे (निलेश जगदाळे) किती कौतुक… पाहुणे म्हणायची ती बाबांना, कारण जावयाचे नाव घ्यायचे नसते. आम्हा सगळ्यांची चिंता फक्त तिलाच’.
‘विजय सावंत मशाल दौडला आला तर दहा वेळा मला फोन केला त्याची काळजी घे, तुम्ही नीट या…. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांसाठी जेवणाची सोय नानांनी केली ती आजीच्या घरी. आजी, मामा, मामी, विजय, अक्षय सगळेच कामाला लागले. एखादी जबाबदारी पार पाडताना सगळ्यांना अगदी प्रेम द्यायची. तिचे प्रेम, तिची माया, घरात शिरल्या शिरल्या तिने घेतलेली पप्पी सगळेच आता परत अनुभवता नाही येणार… माझी आजी’. अश्विनीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देत तिच्या दुःखात सहभाग दर्शवा आहे. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी अश्विनीच्या आज्जीला श्रद्धांजली वाहिली आहे.