हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अख्ख जग ज्यांना बापू म्हणून ओळखतं त्या महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नव्हते तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले. या वक्तव्याने सर्व माध्यमांवर दाणदाण उडवली आणि राज्याचं राजकारण प्रचंड तापलं. दरम्यान सोशल मीडियावर भिडेंना टीकेचा सामना करावा लागला. कला विश्वातील अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला. ज्यामध्ये अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी महात्मा गांधींवर एक छोटीशी कविता सादर केली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कवितेतून गांधीजी यांचे विचार आणि त्यांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या लोकांवर त्यांनी अत्यंत मार्मिकपणे टीका केली आहे. गांधीजी यांच्या मरणावर ही कविता भाष्य करताना न बोलूनही बरंच काही बोलून जाते. ही पोस्ट शेअर करताना अतुल कुलकर्णी यांनी कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेलं नाही. पण या कवितेला कॅप्शनची गरज आहे असे वाटतही नाही. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ही कविता त्यांनी सादर केली होती. हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अतुल कुलकर्णी यांची कविता पुढीलप्रमाणे (मराठी)
तू मर बुआ एकदाचा…
एssss असं नसत करायचं
मारलं, की मरायचं
गोळ्या किती महाग असतात..
दरवर्षी घ्याव्या लागतात..
पिढ्यान् पिढ्या मेल्या तुला मारुन, मारुन
तू थकत कसा नाहीस मरून, मरुन..?
बाप्प्प्पूssss,
असं नसतं करायचं
मारलं, की मरायचं
एकदा मारुन मेला नाहीस,
अनेकदा टोचून विरला नाहीस,
बदनाम करून बधत नाहीस..
असं, त्यांना पुरून उरायचं नसतं
मारलं, की निमूट मरायचं असतं
तू ना, एक संधी देऊन तर बघ
नोटांवरून जाऊन तर बघ,
ती सबकी सन्मति घालवून तर बघ,
असा खूनाचाच वध करायचा नसतो..
जीव घेतला, की सोडायचा असतो..
असं, त्यांना पुरून उरायचं नसतं
मारलं, की निमूट मरायचं असतं….
जाऊदे, ठीक आहे..!!
पुढच्या वर्षी नक्की मर.. ओके..? – अतुल कुलकर्णी