‘… म्हणून शिंगणापूरच्या मंदिराला घुमट किंवा कळस नाही’; अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ पोस्टचे कॅप्शन चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेची वेगवेगळ्या ढंगाची आणि उडत्या चालीची गाणी हि कायम रसिकांसाठी आकर्षण ठरतात. आपल्या आवाजाने आणि ठसकेबाज अंदाजाने अवधूतने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. त्याच्या गायकीचं वेड प्रत्येक वयोगटात पहायला मिळतं. शिवाय अवधूत सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळे लूक आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देऊन तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. गायक, संगीत दिग्दर्शक, सूत्रसंचालक, परिक्षक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून तो कायम परफेक्ट राहिला आहे. पण वैयक्तिक आयुष्यात अवधूत कसा आहे ते त्याच्या पोस्टवरून समजत असतं.

सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे अवधूत कायम आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करताना दिसतो. अवधूतने नुकतेच शनिशिंगणापूरला जाऊन शनिदेवांचे दर्शन घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ त्याने स्वतःच शेअर केला असून सोबत एक कॅप्शन लिहिलं आहे. या कॅप्शनची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ शेअर करत अवधूतने शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवांच्या मंदिराला घुमट किंवा कळस का नाही..? याचं कारण सांगितलं आहे.

हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलंय, ‘मध्यंतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरामपूरला जाणं झालं. तिथून थेट शनिशिंगणापूर गाठलं. माननीय आमदार शंकररावजी गडाख यांच्या सौजन्याने शनि देवाचं आयुष्यात पहिल्यांदाच दर्शन घेतलं. शनिदेव हा सूर्यपुत्र अर्थात सूर्याचा पुत्र आहे. त्यामुळे त्याला नेहमीच सूर्यकिरणांखाली राहायला आवडतं. यामुळेच या मंदिराला घुमट किंवा कळस नाही आणि याचे बांधकामदेखील केलेलं नाही. त्यामुळेच शनिदेवाला हार- फुलं न वाहता तेल वाहिले जाते’. अवधूतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून कॅप्शनची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.