शिट्ट्या वाजणार.. फेटे उडणार.. जेव्हा ढोलकीच्या थापेवर अन घुंगरांच्या बोलावर ‘लावण्यवती‘ थिरकणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वाला अत्यंत श्रवणीय आणि उडत्या चालीची एनर्जेटिक गाणी देणारा प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शिवाय आगामी प्रोजेक्ट्सचीदेखील माहिती देतो. आताही त्याने लवकरच येऊ घातलेल्या ‘लावण्यवती’ या अल्बमची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गायक अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट करताना सोबत प्रोमो टिझर शेअर केला आहे.

यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एकविरा म्युझिक तर्फे घेऊन येत आहोत ‘लावण्यवती‘! पुन्हा एकदा मैफल रंगणार अल्बमची.. पुन्हा एकदा लडी सजणार गाण्यांची! एका पाठोपाठ एक अशी येणार चार गाणी.. हातात हात गुंफून सांगणार एकच कहाणी! ढोलकीच्या थापेवर, घुंगरांच्या बोलावर थिरकणार ‘लावण्यवती‘! मग शिट्ट्याही वाजणार.. फेटेही उडणार! परंतु, दरवेळेस प्रयत्न होणार काहीतरी नवीन शोधण्याचा.. काहीतरी नवीन करण्याचा! म्हणून आम्हीच म्हणतो.. की ही ‘लावणी‘ नव्हेच.. ही तर ‘कापणी‘!! पहिलं पुष्प.. लवकरच!!’

अवधूत गुप्तेची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याचे चाहते या अल्बमची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘लावण्यवती’बद्दल अवधूत गुप्ते म्हणाला, ”लावणी नाही कापणी’ अशी या ‘लावण्यवती’ची टॅगलाईन आहे. तर अनेकांना हा प्रश्न आहे, याचा नेमका अर्थ काय? तर हा अल्बम पाहून, ऐकून याचा उलगडा होईल. चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी श्रीगणेशाने करायची असते. म्हणूनच या अल्बममधील पहिले पुष्प म्हणजेच ‘गणराया’ ही लावणी तुमच्या भेटीला आली आहे. हळूहळू बाकी पुष्पही तुमच्या भेटीला येतील. ‘लावण्यवती’ ह्या अल्बममध्ये वेगळ्या धाटणीची चार गाणी आहेत. प्रत्येक लावणीची एक खासियत आहे. आमचा हा नवीन प्रयत्न संगीतप्रेमी आणि नृत्यप्रेमींना नक्कीच भावेल’.