हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची रिलीजआधीपासून अनेक दिवस खूप चर्चा होती. यानंतर आता जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला आहे तेव्हा विशेष करून महिला वर्ग चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. सर्वत्र या चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत. अशातच आता या चित्रपटातील सर्व अभिनेत्रींनी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.
हा चित्रपट महिलांसाठी विशेष पर्वणी असून यामध्ये ६ बहिणींची कथा आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची सगळी टीम ठिकठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहे. यानिमित्त जेव्हा या सहा जणी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या तेव्हा त्यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. दरम्यान जेव्हा आदेश भावोजी केदार शिंदेंच्या बाजूने बोलत तेव्हा सर्वजणींनी आपली बाजू मांडली. या विशेष भागाचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात केदार शिंदे यांनी हजेरी लावली नव्हती. तर आदेश बांदेकर गंमतीत म्हणाले, ‘आज दिग्दर्शक केदार शिंदे येणार होते पण या सहा जणांनी त्यांना इतकं नम्रपणे वागवलं असल्याने त्यांची मान दुखली असं मला कळलं आहे. या सगळ्या जणींसमोर सतत ते नतमस्तक होऊन वावरत होते’.
यावर लगेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, ‘त्याने खरंच आम्हाला उगाचच सगळ्या मुलाखतींमध्ये बदनाम केलं आहे. आम्ही त्याच्याशी खूप चांगल्या वागलो आहोत’. शिवाय अभिनेत्री शिल्पा नवलकरदेखील सहमती दर्शवत म्हणाल्या, ‘आज तो नाही तर आपण बोलून घेऊया का..?’ मग सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांचं बोलणं ऐकून आदेश बांदेकर म्हणाले, ‘जेव्हा मला त्याचा आज फोन आला की माझी मान दुखत असल्यामुळे मी येऊ शकत नाही, तेव्हाच मी त्याला म्हटलं की बरं झालं म्हणजे त्या निमित्ताने आज यांच्या भावना बाहेर येतील. पण कसा होता एकंदरीत केदार बरोबर काम करण्याचा अनुभव..? तुम्ही सेटवर त्याला जो काही त्रास देत होतात, सेटवर वेळेवर येत नव्हता. ते सगळं तो गेले काही दिवस पोस्टच्या माध्यमातून नम्रपणे चाहत्यांना सांगत होता. यावर अभिनेत्री सुकन्या मोने म्हणाल्या, ‘आम्ही त्रास दिला पण असा नाही दिला. आम्ही त्याला काम करून त्रास दिला. त्याला आम्हाला सांगावं लागायचं की आता हे थोडं कमी कर किंवा हे आता वाढवू नका, असा आम्ही त्याला त्रास दिला’.