हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात शुक्रवारी ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चित्रपट गृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पहायला मिळतेय. विशेष म्हणजे या चित्रपटाबाबत महिलावर्ग मुख्य करून उत्सुक दिसत आहे. थिएटरमध्ये महिला प्रेक्षकांची मोठी संख्या पहायला मिळतेय. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला असून आतापर्यंत या चित्रपटाने तुफान कलेक्शन केलं आहे. माहितीनुसार या चित्रपटाने विकेंडला रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफीसवर ६.४५ कोटींची कमाई केली आहे आणि या वर्षातली मराठी चित्रपटांमध्ये ही रेकॉर्ड ब्रेक कमाई आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळालेलं अनपेक्षित यश पाहून सम्पजुर्न टीम भारावली आहे. या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. केदार शिंदे म्हणाले, ‘ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे हाऊसफुल्लचे बोर्ड मी पाहतो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात’.
पुढे म्हणाले, ‘अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने ”सही रे सही” नंतर ”बाईपण भारी देवा”चं हे यश पाहतो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन’. जिओ स्टुडियोजचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून तुफान प्रतिसाद मिळवतो आहे. या चित्रपटातील ६ बहिणींची गोष्ट प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जगण्याची प्रेरणा देतो आहे. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब चौधरी या ६ गुणी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसत आहेत.