हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीजपासूनच बॉक्स ऑफिसवर अशी काही जादू केली आहे कि बस्स!! दिवसेंदिवस या चित्रपटाचं क्रेझ वाढू लागलं आहे. चित्रपटाची दमदार कामगिरी भारावून टाकणारी आहे. नुकताच या चित्रपटाच्या भव्य कमाईचा आकडा समोर आला आहे. याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय कि, ‘भारतमाता की जय… बाईपण भारी देवा या सिनेमाने आणखी भरारी मारली.. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र झाली. सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि ती इतर सिनेमांनाही फायद्याची ठरली!! एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते. याची ग्वाही या सिनेमाच्या निमित्ताने दिली गेली. लवकरच ५० वा दिवस साजरा करू. सहकुटुंब सहपरिवार आता गर्दी होते आहे. पुढची वाटचाल सोपी नाही पण अवघडही नाही. कारण तुम्ही सोबत आहात. श्री स्वामी पाठीशी आहेत.. आणि श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद टप्प्या टप्यावर मिळतो आहे’.
आतापर्यंत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने तब्बल ७६.०५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच चित्रपट रिलीज होऊन ४० दिवस उलटून गेले आहेत आणि तरीही या चित्रपटासाठी प्रेक्षकांची होणारी गर्दी ही फारच आनंद देणारी आहे. अजूनही अनेक चित्रपटगृहात ‘बाईपण भारी देवा’साठी हाऊसफुलच्या पाट्या लागताना पहायला मिळत आहेत. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले असून मराठी सिनेसृष्टीला अभिमान वाटावा अशी गौरवशाली कारकीर्द तयार केली आहे.