‘बाईपण भारी देवा’ने नुसतं यश दिलं नाही तर..; चित्रपटाला मिळणारे प्रेम पाहून निर्मात्यांनी व्यक्त केला आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम पाहून संपूर्ण टीम भारावली आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय आणि थिएटर गाजवतोय. मराठी सिनेमा म्हणून ‘बाईपण भारी देवा’ला मिळालेलं यश खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणून सर्व स्तरांवरून सिनेमाचं कौतुक होत आहे. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी नुकताच चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टीचा आनंद लुटला आहे. दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांनीही आपला आनंद व्यक्त करताना प्रतिक्रिया दिली आहे.

निर्मात्या माधुरी भोसले म्हणाल्या कि, ‘चित्रपटाला मिळणार यश पाहून नक्कीच चांगलं वाटतंय. पण त्यापेक्षाही छान एका गोष्टीच वाटतंय ती म्हणजे, चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. चित्रपट पाहताना सगळे अगदी गुंतूनच जातात. नकळतपणे चेहऱ्यावर हसू येतं, नकळतपणे भावनिक होतात. एन्जॉय करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरांनाही चित्रपट पाहण्यासाठी उत्स्फुर्तपणे आवाहन करतात. अगदी स्वतःची फिल्म असल्यासारखं बाईपणला उचलून धरलं जातंय प्रेक्षकांकडून. ही फिल्म केल्यानंतर मला काहीतरी मोठं केलंय यापेक्षा काहीतरी भारी केलंय असंच वाटतं नेहमी. बॉक्सऑफिस वरचे यश आहेच पण मला हेही तितकच महत्वाचं वाटतं कि ज्यांच्यासाठी ही फिल्म केलीय त्यांना ती अतिशय आवडतेय आणि ते भरभरून प्रेम देताहेत’.

इतकेच नव्हे तर निर्मात्या माधुरी भोसले असेही म्हणाल्या कि, ‘बाईपण भारीपण देवा या चित्रपटाने नुसतं यश दिलं नाही तर एक ऊर्जा, बळ आणि आत्मविश्वास दिला आहे’. एकंदरच आगामी काळात माधुरी भोसले प्रेक्षकांसाठी आणखी काही वेगळ्या कथानकाचे चित्रपट घेऊन आल्या तर नवल वाटायचे कारण नाही. रिपोर्टनुसार, मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून घवघवीत यश मिळवत असलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने अवघ्या २० दिवसात ६२ कोटींची घसघशीत कमाई केली असून अजूनही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे.