हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| केदार शिंदे यांचा ‘ बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीसाठी दर्जेदार कलाकृती ठरला आहे. या चित्रपटातील ६ बहिणींची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटाला विशेषतःमहिला प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने जंगी सेलिब्रेशन केलं आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि प्रतिसाद पाहून केवळ टीमला नव्हे तर कळा क्षेत्रातील प्रत्येकाला एक वेगळा आनंद वाटतो आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या ६ गुणी अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.
हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ५४ कोटींची कमाई केली आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या यशाचे पूर्ण श्रेय कुणा एकाला नव्हे तर चित्रपटाच्या पूर्ण टीमला आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांना जाते. हे यश नक्कीच साजरे करण्यासारखे आहे.
या चित्रपटाचे असे भव्य यश साजरे करण्यासाठी वलय मुळगुंद यांनी मुंबईत सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. वलय यांनी या सक्सेस पार्टीचे काही फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या टीमने वरळी येथील एका हॉटेलमध्ये या सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण टीमने केक कापून आपल्या यशाचा आनंद साजरा केला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळी तसेच तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. या सक्सेस पार्टीतील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.